शिंदे फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची यादी निश्चित
शिंदे गट आणि भाजपामधील हे आमदार होणार मंत्री, राष्ट्रवादीला देणार शह
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांचं लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारात वर्णी न लागलेले इच्छुक आज तरी विस्ताराला मान्यता मिळावी अशी आशा लावून आहेत कारण पहिला विस्तार आॅगस्टमध्ये पार पडल्यानंतर सतत नवनवीन तारखा येत असल्या तरीही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत होता. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले अपक्ष आमदार बच्चू कडू यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे तर भाजपाकडुन संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर या नावाची चर्चा आहे. पण भाजप धक्कातंत्र वापरण्यात तरबेज असल्याने एैनवेळी एखादा अनपेक्षित चेहरा मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तर आता निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची यावर कायदेशीर लढाई सुरु असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत असल्याने इच्छुकांचा हिरमोड होत आलेला आहे.
अमित शहा यांच्याबरोबरील बैठकीमध्ये राज्यातील नवीन सहकारी कायदा, मल्टी स्टेट बँक आणि कारखान्या संदर्भातील नवीन कायदा, साखर उद्याग, कापूस प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग, इथेनॉल धोरण, मासेमारी, आजारी कारखाने आदी मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यातून सहकार क्षेत्रावरील राष्ट्रवादीला शह देण्यावर मंथन होणार आहे.