Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर उघडा पाडणार!

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, मराठा आरक्षण, महाराष्ट्राला ड्रग माफियांनी घातलेला विळखा चिंताजनक

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने महाराष्ट्रातील जनतेला वा-यावर सोडले आहे. राज्याच्या बहुतांश भागामध्ये खरीप पीकं वाया गेली असून रब्बीची पेरणीही होऊ शकत नाही एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही तसेच शेतक-यांना मदतही केली नाही. मराठा समाजाची आरक्षण देतो म्हणून फसवणूक केली असून या सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून ड्रग माफियांनी राज्याला विळखा घातला आहे. राज्यातील अपयशी अनैतिक आणि लोकविरोधी सरकारचा खोटारडेपणा उघड करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज गरवारे क्लब हाऊस येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रचंड अधोगती झाली असून जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत फिरत आहेत. राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. बहुतांश भागामधील खरीपाची पिके वाया गेली आहेत. पाऊस नसल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकत नाही. अनेक गावांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून टॅंकर सुरू आहेत. एवढी भयावह परिस्थिती असताना ही सरकारने अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही. शेतक-यांना मदत केली नाही. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना मदत करावी या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारने मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. आरक्षणाच्या मागणीवर राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाले आहे. सरकारने मराठा समाजाची कशी फसवणूक केली आहे यासंदर्भात काँग्रेस जनतेमध्ये जाऊन या सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडणार आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिघडलेली असून राज्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे कारखाने सुरु आहेत. नाशिक सोलापूर, पालघर, छत्रपती संभाजीनगर अशा शहरांमध्ये ड्रग्स माफियांना कारखाने उघडले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ललित पाटील सारख्या ड्रग माफियांना विळखा घातला असून त्यांना जेलमध्ये पाठवून कारवाई करण्याऐवजी त्यांना रूग्णालयात ठेवून पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सरकारच्या आशिर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ड्रग्सचा कारभार होऊच शकत नाही. या ड्रग माफियांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहे. आजच्या बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी राज्यातील विद्यमान परिस्थितीत आणि राज्यासमोरील गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात आंदोलन करून पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्ष सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर उघडा पाडणार असून हिवाळी अधिवेशनात या सर्व मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!