
ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेवर शिंदे गटाचा हल्ला
मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल, हल्ला झालेली महिला गर्भवती, तक्रार दाखल
ठाणे दि ४(प्रतिनिधी)- ठाण्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कासारवडवली येथे ठाकरे गटातील एका महिलेला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.
ठाणे शहरात शिंदे गटाकडून मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव रोशनी शिंदे आहे त्या टिटवाळा येथे राहतात. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवती सेनेसाठी काम करतात. सोमवारी सायंकाळी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटनेची चर्चा सुरू झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिलांचा एक गट रोशनी शिंदे यांना घेरून वाद घालत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रोशनी शिंदे यांनी म्हटलं आहे की, “टाटा मोटर्स कासारवडवली येथे कामावर असताना ऑफिसमध्ये शिंदे गटाच्या महिलांनी मला शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला केला, असा आरोप केला आहे. यावेळी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिलांनी एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली, असा दावा केला आहे. दरम्यान रोशनी शिंदे या गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
मारहाण करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. खासदार राजन विचारे, केदार दिघे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली आहे.