
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात दाखल झालेल्या आमदार लता सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. अशी माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिली आहे. असे झाल्यास शिंदे गटाचा एक आमदार कमी होण्याची शक्यता आहे.
लता सोनवणे या २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या.माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जातपडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते. त्यावेळी प्रमाणपत्र अवैध असल्याचे सिद्ध झाले होते. न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला आहे.वळवी यांनी सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन दोन नंबरच्या उमेदवाराला विजयी घोषित करावे अशी मागणी केली आहे.लता सोनवणे यांनी याबाबत आपले मत अद्याप व्यक्त केलेले नाही. पण त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांनी पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
शिवसेना आणि शिंदे गटात सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. अशावेळी प्रत्येक आमदार महत्वाचा आहे. पण आता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सोनवणेसह शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.