शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मोठा दणका, ठाकरे निर्णयाला आव्हान देणार?
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात ४० आमदारांसोबत बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. निवडणूक आयोगाने विधीमंडळ प्रतिनिधींचा पाठिंबा ग्राह्य धरत शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. ठाकरेंचा वाट आता आणखीनच बिकट असणार आहे.
या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी हा लोकशाहीचा विजय अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर हा न्याय नाही असे म्हणत या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.