
शिंदे गटाची शिवसेना नेमक्या कोणत्या बाळासाहेबांची?
नेटक-यांकडून एकनाथ शिंदे गट जोरदार ट्रोल,भाजपाही टार्गेट
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन गटांपैकी ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना अशी नावे दिली आहेत. मात्र, शिंदे गटाला दिलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नावावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.महाराष्ट्रातील राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणखी तीन जणांना ‘बाळासाहेब’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शिंदे गटाच्या नावात ठाकरे आडनाव नसल्यामुळे शिंदे गटाला फक्त नावावरुन ट्रोल केले जात आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात बाळासाहेब ठाकरेंबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर असे चार बाळासाहेब आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी शिंदे गटाला तुफान ट्रोल केले आहे.त्याचबरोबर चिन्ह नसल्यामुळे देखील ट्रोलिंग होत आहे. नेटकरी बाळासाहेब आंबेडकर, बाळासाहेब थोरात यांचा फोटो वापरून ही या बाळासाहेबांची शिवसेना आहेत असे मिम्स करत आहेत. त्याचबरोबर ‘शिंदे गटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला’ असा मेसेज देखील व्हायरल झाला आहे.त्याचबरोबर ‘हे कुठले बाळासाहेब?’ बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब सामंत की बाळासाहेब कदम, असा खिल्ली उडवणारा सवालही नेटकरी शिंदे गटाला करत आहेत. त्यामुळे आगामी काळात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावावरुन आणखी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी नवी नावं आणि चिन्हं दिल्यानंतर लगेचच नव्या राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या नावावरून सुरु असलेली आॅनलाईल लढाई चिन्हावरुन देखील रंगण्याची शक्यता आहे.