Just another WordPress site

खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘एक कदम स्वच्छता की ओर’

सु़ळेंचे नागरिकांना महत्वाचे आवाहन, तुम्हालाही वाटेल अभिमान

मुळशी, दि. ११ (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी या भागावर निसर्गाचे वरदान आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हा भाग आहे. या भागात फिरायला किंवा अन्य कोणत्याही कामासाठी गेलेल्या पर्यटक अथवा प्रवाशांनी प्रवासादरम्यान गाडीतून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव येथे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

खासदार सुळे सोमवारी मुळशी तालुका दौऱ्यावर होत्या. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेट दिली. या दौऱ्यात असताना प्रवासादरम्यान निसर्गाने परिपूर्ण असलेल्या अनेक भागात गाडीतून उतरून त्यांनी निसर्गाचा अनुभव घेतला. अनेक ठिकाणी त्यांना स्वतः आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ घेण्याचाही मोह आवरता आला नाही. त्यावेळी स्वतः घेतलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हे आवाहन केले आहे.

GIF Advt

बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, भोर आणि वेल्हा भागातून प्रवास करीत असताना निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभविता येते. याशिवाय राज्यातील सह्याद्री असो की सातपुडा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सृष्टीसौंदर्याची रेलचेल असणारी कितीतरी ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील आपल्या भूमीचा अतिशय महत्वाचा ठेवा आहे; परंतु अनेकदा या हिरवाईत आणि निसर्गाने नटलेल्या सुंदर अशा या प्रदेशात ठिकठिकाणी कचरा दिसतो. हे अतिशय वाईट आहे. हा भाग सुंदर आहे. त्याचे सौंदर्य अबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे पर्यटक अथवा अन्य प्रवाशांनी प्रवासादरम्यान गाडीतून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव येथे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपण सर्वांनी निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या ठिकाणांची काळजी घेतली पाहिजे. हा आपला सुंदर ठेवा कायम सुंदर रहावा यासाठी सर्वांनी कचऱ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे. आपण सर्वांनीच सृष्टीसौंदर्याची मुक्त उधळण असणारे परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करुया, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!