दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरूद्ध शिंदे गटाचा वाद न्यायालयात
शिवाजी पार्क मैदानावर आवाज कोणाचा याचा फैसला उद्याच होणार
मुंबई दि २१(प्रतिनिधी) – शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा याचा फैसला उद्या होणार आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु आहे. शिंदे गटाला बीकेसीच्या मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. पण आम्ही अद्याप शिवाजी पार्कवरील हक्क सोडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. महिनाभरापूर्वी अर्ज करूनही परवानगी न दिल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.मुंबई महापालिका, मुंबई महापालिका आयुक्त आणि जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. काहीही झाले तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेणार असा निर्धार शिवसेनेने केला आहे. त्यामुळे संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे, ५ ऑक्टोबरला हा मेळावा होणार आहे. शिवसेना कोणाची यासाठी ही दसरा मेळावा महत्वाचा ठरणार आहे. आत्ता पर्यंत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच पार पडला आहे. अपवादात्मक परिस्थितीत दसरा मेळावा थेट रद्द करण्यात आला आहे. पण मैदान शिवाजी पार्कच ठेवण्यात आले आहे.