
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले
उद्धव ठाकरेंना धक्का, शिवसेना नावही वापरता येणार नाही
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- धनुष्यबाण कोणाचा यावर शिंदे आणि ठाकरे गटात होणारे दावे प्रतिदावे आता थांबले असुन निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना या चिन्हा वापर करता येणार नाही. यासह दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असून अंधेरी पोटनिवडणूकीसाठी ठाकरे गटाला दुस-या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हासंबंधी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यासंबंधी कागदपत्रे आणि उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने शिंदे गटाकडून शिवसैनिकांचे शपथपत्र आयोगाकडे सादर केले. तर, ठाकरे गटाकडून आयोगात कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही गटाने आपले म्हणणे आयोगापुढे मांडणे होते.शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे हा अंतरिम निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकापुरता मर्यादित आहे. हा निर्णय बदलला जाऊ शकतो. आता उद्धव ठाकरे कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता आहे दरम्यान ठाकरे गटाकडून या निर्णयावयरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. पण ३३ वर्षापासूनचे चिन्ह शिवसेनेला वापरता येणार नाही.
निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवाय तीन दिवसात नवीन नाव आणि चिन्हाविषयी निर्णय घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत ठाकरे गदा आणि शिंदे तलवार चिन्ह घेण्याची शक्यता आहे.