शिवसेनेच्या धनुष्यबाण कोणाचा? या तारखेला फैसला
ठाकरे आणि शिंदे गटात अटीतटीचा सामना, हा फॅक्टर ठरणार महत्वाचा
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या चिन्हावरुन सुरु असलेला ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आता लवकरच निकाली निघणार आहे कारण १२ डिसेंबरला शिवसेना पक्ष चिन्हाबाबतनिवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. यावेळी दोन्ही गट युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षा बरोबर चिन्हाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. ही मुदत २३ नोव्हेंबरला संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत. आता दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञा कागदपत्रांची छानणी केली जाईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी केली जाईल. कागदपत्रे महत्वाचा पुरावा ठरणार आहेत.सध्या निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आले आहे. ठाकरे गटाने मशाल चिन्हावर अंधेरीची पोट निवडणूक मशाल चिन्हावर जिंकत विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणीही लांबणीवर गेली आहे.पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती सुनावणीसाठी उपलब्ध नसल्यानं सुनावणी लांबणीवर पडली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षचिन्हाचा वाद सुटला नाही तर दोन्ही गटातील नेत्यांना ढाल तलवार आणि मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागणार आहे. याआधीही अशा निकालांना किमान वर्षाचा कालावधी लागला आहे. आणि फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये महापालिका निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.