शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी सध्याचे आदर्श
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य, राज्यातून संतप्त प्रतिक्रिया
ओैरंगाबाद दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली.या कार्यक्रमात कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले आहे ते म्हणाले, “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असे म्हणत कोशारी यांनी वाद ओढावून घेतला आहे. राज्यापालांनी शिवाजी महाराजांबद्दल या आधीही वादग्रस्त विधाने केली आहेत.
कोशारी यांच्या विधानानंतर संभाजी महाराजांनी राज्यपालांचा निषेध केला आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसं? असा संतप्त सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.