Latest Marathi News
Ganesh J GIF

ठाकरेंना धक्का देत निलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

शिंदे गट फुटण्याची चर्चा असताना ठाकरे गटालाच गळती, या कारणामुळे गोऱ्हेंचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या विधानपरिषेदेवरील आमदार नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाची गळती थांबत नसल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानपरिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. माध्यमात पक्षाची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे या परिचित आहेत. पण मध्यंतरीच्या काळानंतर पक्षात सुषमा अंधारे यांचे वर्चस्व वाढल्यामुळे गोऱ्हे नाराज असल्यामुळे त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. खासदार विनायक राऊत आणि संजय राऊत यांनी शिंदे गटातील नाराज आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र, एक दिवस उलटत नाही तोच ठाकरे गटालाच धक्का बसण्याची शक्यता आहे. आजच त्या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी मात्र नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातच राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. गोऱ्हे या उद्धव ठाकरे गटाच्या एकनिष्ठ म्हणून ओळखल्या जात होत्या. पक्षातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. विधानपरिषदेत गोऱ्हे या उपसभापती असूनही बोलू देत नाहीत अशी तक्रार ठाकरे गटातील आमदारांनी केली होती. तेंव्हापासुन त्या पक्षात एकाकी पडल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.  ठाकरेंचे विधानपरिषदेचेही ३ आमदार शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेतील शिवसेनेचं ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. दरम्यान हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!