पुणे- वैयक्तिक दुश्मनीतून एका पत्रकारावर गेल्या १५ दिवसात दुसर्यांदा हल्ला होण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी या पत्रकारावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हर्षद कटारिया असे या पत्रकाराचे नाव आहे. ते पुण्यातील एका दैनिकामध्ये उपनगर वार्ताहर म्हणून काम पहातात.
याबाबत स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद कटारिया हे सातारा रोडजवळील अतिथी हॉटेलजवळील आपल्या घरी जात होते. सोसायटीच्या दारात ते आले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखून फायरिंग केले. त्यांनी मान खाली केल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, तेथे कोणतीही पुंगळी आढळून आली नाही. सुमारे १५ दिवसांपूर्वी हर्षद कटारिया याच्यावर अशा प्रकारे रस्त्यात गाठून तिघांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून धमकी दिली होती. ती घटना दि. २८ मे २०२३ रोजी घडली होती. त्यावेळी देखील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच गुन्हयात भादंवि ३०७ चे कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, हर्षद कटारिया यांनी अनेकांच्या बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेत अर्ज करुन त्यांचे बांधकाम पाडायला लावले. त्यांच्या वडिलोपार्जित जागेबाबतही वाद सुरु आहे. त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.