
वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा…
विरोधक अब्दुल सत्तारांविरोधात आक्रमक, तर सत्तारांकडून आरोपाचा इन्कार
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या खाजगी व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत आले आहेत.
अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या धाड पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी सह इतर अनेक खाजगी लोकांचा समावेश होता. तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही असे कृषीमंत्री स्वतःच सांगत आहे. यावरून ते किती निर्ढावलेले आहेत हे दिसून येते. अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही. त्यांनी मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतक-यांना धीर दिला नाही अडचणींच्या काळात मदत केली नाही. याऊलट सातत्याने बेजबादार विधाने करून शेतक-यांचा आणि कष्टक-यांचा अवमान केला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळाली पाहिजे याची व्यवस्था करण्याऐवजी कृषीमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे हे अतीशय गंभीर आहे. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
तर या संपुर्ण प्रकरणावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना म्हंटले कि, धाडीत काहीच चुकीचं झालं नाही. मतदारसंघातील माझे सहकारी मला सांगूनच हजर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अकोल्यातून तक्रारी आल्यामुळे कारवाई केल्याचे सत्तारांनी सांगितले आहे. पण यामुळे सत्तार अडचणीत आले आहेत.