गणपती उत्सवाच्या वर्गणीवरुन पुण्यात दुकानदाराला बेदम मारहाण
दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, लोणी काळभोर पोलिसात चाैघांवर गुन्हा दाखल
पुणे दि १२(प्रतिनिधी)- गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक मंडळांची त्यासाठीची तयारी सुरु आहे. त्याचबरोबर वर्गणीसाठी मंडळाचे कार्यकर्ते फिरत आहेत. पण पुण्यात वर्गणी न दिल्यामुळे थेट दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच दुकानाच्या सामानाची देखील नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
दिनेश गोरा असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनेश गोरा यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे. दोन तीन दिवसापुर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी गोरा यांच्या दुकानात येत तीन हजार रुपये वर्गणीची पावती दिली. त्यानंतर रविवारी मंडळाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा गोरा यांच्याकडे गेले. त्यावेळी गोरा यांनी आपण एवढी रक्कम देऊ शकत नाही, तुम्ही काहीतरी रक्कम कमी करून द्या अशी विनंती केली. पण त्यामुळे संतापलेल्या तरुणातील एकाने गोरा यांच्या कानाखाली मारली. पाठीमागे असलेल्या काही तरुणांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करुन दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा दुकानात घुसत गोरा यांना बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. गोरा यांनी यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलीसांनी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे २ व अष्टविनायक मित्र मंडळाचे २ अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या घटनेचा स्थानिक व्यापारी आणि दुकानदार वर्गाकडून निषेध केला जात आहे. तसेच आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांना वर्गणीसाठी कोणालाही सक्ती करू नका असे आवाहन केले होते. पण त्याला काही मंडळांकडून हरताळ फासल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक मंडळाच्या धर्मदाय नोंदी नाहीत तरीदेखील मंडळाकडून पावत्या तयार करून सक्तीने वर्गणी गोळा केली जात आहे. या प्रकारानंतर दुकानदार वर्गात भीतीचे वातावरण आहे.