‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला
प्रेक्षकांना मारहाण, मनसे राष्ट्रवादी येणार आमनेसामने
ठाणे दि ८(प्रतिनिधी)- संभाजीराजेंनी हर हर महादेव आणि वेडात मराठी वीर दाैडले साथ या दोन चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडला. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. दरम्यान प्रेक्षकांना चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे परत देण्यास कार्यकर्त्यांनी मॉल व्यवस्थापनाला सांगितले.पण यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपटात महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामुळे सिनेमागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात शिरून ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. आव्हाड यांनी केलेल्या आवाहनानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. ‘जाणता राजा’ हे महानाट्य त्याचे एक रुप आहे. कारण त्यांचे हे लिखित पुस्तक होते. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीतील काहीजण पुढे नेत आहेत. असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.