‘मी ८ वर्षांची असल्यापासून वडील लैंगिक शोषण करायचे’
अभिनेत्री भाजपाच्या महिला नेत्याचा धक्कादायक खुलासा, आईला सांगू शकले नाही कारण.....
दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आणि अभिनेत्री व राजकारणी खुशबू सुंदर यांनी एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या आठ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर अत्याचार केले होते असा धक्कादायक खुलासा केला आहे.

पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे त्या म्हणाल्या “मला वाटतं जेव्हा एखाद्या लहान मुलावर किंवा मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा त्यांना आयुष्यभर जखमा होतात. माझे वडील एक असे पुरुष होते ज्यांना आपल्या पत्नी आणि मुलांना मारहाण करणे, आपल्या एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं वाटायचं. माझ्यावर जेव्हा पहिल्यांदा अत्याचार झाला तेव्हा मी फक्त ८ वर्षाची होते आणि जेव्हा मी १५ वर्षांची झाले तेव्हा त्यांच्याविरोधात बोलण्याचे धैर्य माझ्यात निर्माण झाले. पण हे सर्व घडत असताना मला एक भीती कायम असायची की जर या गोष्टी मी आईला सांगितल्या, तर कदाचित ती माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण, मी तिला त्या वातावरणात पाहिलं आहे जिथे काहीही झालं तरी पती परमेश्वर आहे, अशी मानसिकता होती.” असे खुशबु म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर मी १६ वर्षांचीही नव्हते आणि आमच्याकडे असलेले सर्व काही माझ्या वडिलांनी विकून टाकले होते. दोन वेळचं अन्न कसं मिळेल हेही आम्हाला माहीत नव्हतं.’ असेही त्या म्हणाल्या आहेत.
‘द बर्निंग ट्रेन’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या खुशबू यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी २०१० मध्ये राजकारणात प्रवेश केला. सुरूवातीला त्या काँग्रेसमध्ये नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. नुकतीच खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.