….तर मी इथून पुढे मी माझे कार्यक्रम बंद करेन
संतापलेल्या गाैतमी पाटीलचा इशारा, आयोजकानांही सुनावले, गाैतमी का चिडली?
अहमदनगर दि २(प्रतिनिधी)- डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणाईची गर्दी होणार हे नक्की. मात्र गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान बेभान झालेल्या तरुणांमुळे अनेकदा गोंधळ झाल्याचं दिसून आलं आहे.आता अहमदनगरमधील एका गावात गौतमीच्या कार्यक्रमात दगडफेकीची घटना समोर आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गाैतमीने गंभीर इशारा दिला आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण तरीही तिने आपल्या अदाकरीने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बदनामीकडे दुर्लक्ष करत तिने नृत्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
आपल्या हटके नृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगरच्या नागापूर येथे करण्यात आले होते. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. हुल्लडबाजांनी इतका गोंधळ घातला की त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाल्या. सरपंचांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे एमआयडीसी पोलीस आणि खासगी बाउन्सर तिथे असताना त्यांच्यासमोर हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला. दरम्यान या सर्व प्रकारानंतर डान्सर गौतमी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या गोंधळानंतर गौतमी पाटीलने डान्सचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद केला. “आम्हीसुद्धा कलाकार आहोत. तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही येतो. तुम्ही त्याचा आनंद घ्या. आम्हीसुद्धा तुमचं छान मनोरंजन करु. तुम्ही असली कामं करु नका किंवा येऊ नका. तसेच यापुढच्या कार्यक्रमात आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम घेणार नसल्याचे गौतमी पाटीलने सांगितले आहे.
दगडफेकीनंतर कार्यक्रमांमध्ये गोंधळ निर्माण होऊन धावपळ सुरू झाली. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या नृत्याने महाराष्ट्रातल्या तरुणाईला वेड लावलं आहे. क्वचितच गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाला नाही असं घडलं आहे. गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिच्या नृत्याची क्रेझ मात्र कायम आहे.