…तर पंकजा मुंडे होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री?
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे संकेत, असे असणार समीकरण, काय घडले?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने शिरकाव करत प्रस्थापित पक्षाच्या मनात धडकी भरवली आहे. राज्यातील अनेक आजीमाजी नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. अब की बार, किसान सरकार असा नारा देत बीआरएसने राज्यातील शेतकऱ्यांना साद घातली आहे. पण आता त्यांनी पुढच पाऊल टाकत थेट राज्यातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात धुरळा उडाला आहे.
केसीआर आषाढी एकादशीनिमित्त २७ जून रोजी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘बीआरएस’चे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी पंकजा मुंडे या बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या महाराष्ट्रात एक सक्षम महिला या नेत्याने जर भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत थेट पक्षात येण्याची ऑफर’ दिली. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास मुख्यमंत्रिपदाची त्यांची इच्छा पूर्ण होईल का असा प्रश्न पत्रकारांनी सानप यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिले. नक्कीच, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप संपूर्ण देशभरामध्ये रुजवण्याचे काम केले. त्यांच्याच कन्येवर भाजपमध्ये अन्याय होत आहे. याबाबत केसीआर त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला, तर केसीआर त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करतील.” असा विश्वास सानप यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात बीआरएसची सत्ता आली पाहिजे. म्हणून राज्यातील २८८ विधानसभा या मतदारसंघात पक्ष म्हणून लढणार आहे अशी माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली. सध्या अनेक इच्छुक आणि इतर पक्षाकडून अडगळीत पडलेले नेते बीआरएस पक्षात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. तसेच भाजपा आपला पक्ष कुठे राहिला आहे, असे म्हणत नाराजी बोलूनही दाखवली होती. त्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भेटणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. पण आता ही संधी त्या साधणार की नाही याबाबत पंकजा मुंडे यांच्याकडून अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही.