…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?
राज्यातील सत्तासंघर्षावर घटना तज्ञांचे मोठे विधान, शिवसेना पक्षाबाबतही दावा, शिंदे अडचणीत?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. पण आता निकालाआधीच घटनातज्ञ कायद्याचा किस पाडताना दिसत आहेत. राज्यातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेंना न्याय मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पण आता असिम सरोदे यांच्यानंतर उल्हास बापट यांनी देखील मोठे विधान करत शक्यता सांगितली.
न्यायालयाच्या निकालात मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांच्या गटाचे १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर उल्हास बापट म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ठरविल्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्रतेची कारवाई फेटाळू शकत नाहीत, तसेच उद्घव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील, असा दावा केला आहे. ‘राज्यपालांची भूमिका चुकीची हे देखील कोर्ट ठरवेल. उद्धव ठाकरे यांचा नैतिक राजीनामा आहे. पण ते बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर आमदार तेव्हाच अपात्र झाले असते. त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू झाला असता’ पण तसे घडले नाही’ असेही बापट म्हणाले आहेत. बापट शेवटी म्हणाले की, ‘अपात्र कारवाई झाली तर एकनाथ शिंदे अपात्र होतात. तसे झाले तर त्यांना मुख्यमंत्री राहता येत नाही. या परिस्थितीमध्ये अन्य कोणी सरकार स्थापन करतात का याची चाचपणी केली जाते. ते न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागून सहा महिन्यात निवडणूक लागेल. मग हा प्रश्न थेट जनतेचा दरबारात जाईल. पुढे जनता ठरवेल उद्धव ठाकरे बरोबर की शिंदे? असे मत बापट यांनी मांडले आहे. दरम्यान या प्रकरणात चाळीस आमदार अपात्र झाल्यास शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना राहणार नाही. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळेल, असेही मत काही घटना तज्ञांनी नोंदवले आहे.
सुप्रीम कोर्टाचे एक न्यायाधीश १५ मेला निवृत्त होणार आहेत. त्याबर भाष्य करताना न्यायाधीश निवृत्त होण्याच्या आत निकाल दिला गेला नाही, तर पुन्हा नवीन सरन्यायाधीश नियुक्त होऊन सर्व सुनावणी प्रक्रिया पुन्हा पार पाडावी लागेल’.असे मत उल्हास बापट यांनी मांडले आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाचा निकाल अनेक अर्थाने दिशा ठरवणारा असणार आहे.