श्री संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा दहिटणे नगरीत मुक्कामी
रांगोळ्या आणि हरिनामातून भक्तीमय वातावरण, कार्तिकी सोहळ्याची शेकडो वर्षाची परंपरा
बार्शी दि ३०(प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा आज चांगदेव पाटलांची कर्मभूमी असलेल्या दहिटणे नगरीत मुक्कामासाठी विसावला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री क्षेत्र वाणेवाडी ते पंढरपूर पालखी सोहळ्याची शतकापेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे.
कार्तिकी एकादशी निमित्त याहीवर्षी पालखी सोहळा दहिटणेत मुक्कामाला आहे. पालखीच्या आगमनासाठी रांगोळी काढून उत्साही वातावरण निर्मिती करण्यात आली होती. पालखीचे दहिटणेत आगमन झाल्यानंतर सुरुवातीला प्रवचन पार पडले. त्यानंतर पालखी हनुमान मंदिरात मुक्कामासाठी विसावली. यावेळी वारक-यांबरोबर ग्रामस्थही सहभागी झाले होते. त्यानंतर कीर्तन सोहळा पार पडला याही कार्यक्रमाला मोठा भाविकवर्ग उपस्थित होता. त्यानंतर पालखीतील भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विकास घडमोडे, लिंबाजी घडमोडे,बसवेश्वर घडमोडे,विठ्ठल काशीद यांच्यातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तर गावातील अनेक ग्रामस्थांकडून चहाची देखील सोय करण्यात आली होती. पालखीमुळे गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.

संत गोराबा काका कुंभार हे मराठवाड्यातील फार मोठे विठ्ठल भक्त होते. तसेच त्यांनी आपल्या अभंगातून विठ्ठल भक्तीबरोबर समाजप्रबोधन देखील केले. त्यांनी सुरु केलेला पालखी सोहळा पांडूरंग महाराज उंबरे आणि सहका-यांनी अखंडपणे सुरु ठेवली आहे. तसेच वाणेवाडी गावातही नेहमीच भागवत धर्माची पताका कायम उंचावत ठेवली आहे.