Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले

भाजपाच्या ‘महाविजय २४’ अभियानाला सुरुवात, पुणे लोकसभा भाजपाचाच गड राहणार

पुणे दि १४ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ‘महाविजय २४’ या अभियानाच्या पुणे लोकसभा समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात स्विकारले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीळ मुळीक उपस्थित होते. भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून २००२ पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांना ही जबाबदारी मिळाली आहे. शिवाय पुणे लोकसभेंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.

नियुक्तीबाबत भिमाले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आणि पार्टीने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्याचा प्रयत्न आहे. पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकेल, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे. संघटनेत आजवर मिळालेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडली असून नवी जबाबदारीही पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेतून निभावली जाईल’. असा विश्वास व्यक्त केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!