अजबच! आमदारकीसाठी पतीविरोधात पत्नी मैदानात
नवरा बायकोत होणाऱ्या लढतीकडे देशाचे लक्ष, निवडणुकीतील सर्वात अनोखी लढत, पत्नीमुळे पती अडचणीत?
जयपूर दि ३(प्रतिनिधी)- राजकारणात अनेकदा जवळचेच लोक विरोधात उभे राहिल्याची अनेक उदाहरणे आहेत. काका पुतण्या, बहीण भाऊ, आजोबा नातू अशा अनेक लढती नागरिकांनी अनुभवलेल्या आहेत. पण राजस्थानात मात्र एक वेगळीच लढत पहायला मिळत आहे. कारण विद्यमान आमदाराला थेट त्यांच्या पत्नीनेच आव्हान दिले आहे. याची जोरदार चर्चा होत आहे.
राजस्थानमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. पण सध्या एका वेगळ्याच लढतीची चर्चा रंगली आहे. कारण येथील एका जागेवर पत्नीनेच पतीला आव्हान दिले आहे. राजस्थानातील दंतारामगड मतदारसंघात विद्यमान आमदार विरेंद्रसिंह यांना त्यांच्या पत्नीने प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान दिले आहे. वीरेंद्र सिंह हे राजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सात वेळा आमदार राहिलेले नारायण सिंह यांचे पुत्र आहेत. तर रीता सिंह यांना हरियाणामध्ये मजबूत पकड असलेल्या जननायक जनता पार्टीने तिकिट दिले आहे. ‘लोकांना बदल हवा आहे. म्हणून मी निवडणूक लढवित आहे’, असे रिटा यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी ‘जेजेपी’मध्ये प्रवेश केलेल्या रिटा चौधरी यांना पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षपद बहाल केलेले आहे. सिकर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रिटा चौधरी ग्रामीण भागात सक्रीय आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. अर्थात सध्या कोण बाजी मारणार हे निश्चित नसले तरीही या अनोख्या लढतीची जोरदार चर्चा देशात सुरु आहे.
सध्या नारायण सिंह स्वतः त्यांच्या मुलाच्या समर्थनात आहेत, तर डॉ. रिता सिंग स्वतः मैदानावर व्यस्त आहेत. रिटा यांचा निवडणूक रिंगणात प्रवेश झाल्याने भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो.