राजकोटमध्ये सुर्यकुमार यादवची हवा, ठोकले वेगवान शतक
श्रीलंकन गोलंदाजांना सुर्याकडून धुलाई, भारताने उभा केला धावांचा डोंगर
राजकोट दि ७ (प्रतिनिधी) – भारत श्रीलंका दरम्यान सुरु असलेल्या टी २० सिरिजच्या शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या. दोन्ही संघातील ३ सामन्यांच्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे या सामन्याला फायनलचे स्वरुप आले आहे.
सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. जेव्हा तो मैदानावर आला तेव्हा टीम इंडियाने ५२ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या बॅटच्या चाहत्यांना मैदानावर स्फोटक खेळी पाहायला मिळाली. त्याने ५१ चेंडूंचा सामना करत नाबाद ११२ धावा केल्या. या शतकी खेळीत सूर्यकुमार यादवने ७ चौकार आणि ९ षटकार ठोकले. सूर्यकुमारने लंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने फक्त २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना टी-२० मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले. या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर असून त्याने श्रीलंकेविरुद्ध २०१७ साली इंदूर मैदानावर ३५ चेंडूत शतक पूर्ण केले होते. सुर्याच्या या खेळीच्या बळावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय डावाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू सूर्यकुमार यादव हाच होता. श्रीलंकेने शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा ८ षटकात ३ गड्याच्या बसल्यात ६० धावा केल्या होत्या.
सूर्यकुमार यादवने गेल्यावर्षी मध्ये इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिले टी-२० शतक झळकावले होते. इंग्लंडविरुद्ध त्याने ११७ धावांची खेळी केली होती. तर दुसरे शतक न्यूझीलंडविरुद्ध झळकावले होते. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने १११ धावांची नाबाद खेळी खेळली होती. तर आज लंकेविरुद्ध तिसरे शतक झळकावले होते. आता त्याच्या पुढे फक्त ४ शतकासह रोहित शर्मा आहे.