
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या होणाऱ्या खासदार पतीचे निलंबन
काही दिवसापूंर्वीच पार पडला होता साखरपुडा, चाैकशी होईपर्यंत खासदार निलंबित, म्हणाले माझ्यावरील आरोप..
दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही निलंबनाची मुदत वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आप विरुद्ध भाजपा वाद पेटण्याची शक्यता आहे.
राज्यसभेतील ५ खासदारांचा असा दावा आहे की, त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला होता. हा वाद चव्हाट्यावर येताच राज्यसभेच्या उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा (बीजेडी), नरहरी अमीन (भाजप), सुधांशू त्रिवेदी (भाजप), फांगनॉन कोन्याक (भाजप ) आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीची मागणी केली होती. राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. विशेषाधिकार समितीनं पाठवलेल्या नोटीसला उत्तर देऊ, असं राघव चढ्ढा यांनी सांगितलं होतं. खासदार म्हणून आपली प्रतिमा खराब करणाऱ्या भाजपच्या डावपेचांचा मी पर्दाफाश करणार असल्याचंही राघव चढ्ढा म्हणाले. आम आदमी पक्षानं राघव चढ्ढा यांच्यावरील कारवाईला कट असल्याचं म्हटलं आहे. राघव चढ्ढा यांच्यासोबत आपचे दुसरे खासदार संजय सिंह यांचे देखील दुसऱ्या एका प्रकरणात निलंबन वाढविण्यात आले आहे. विशेषाधिकार भंगाचा अहवाल येईपर्यंत राघव चढ्ढा यांचे निलंबन कायम राहणार आहे.
आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. लवकरच ते लग्न करणार आहेत. आता परिणीती आणि राघव हे लग्न कधी करणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. पण सध्या चढ्ढा यांना निलंबणाला सामोरे जावे लागत आहे.