राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे निलंबन
अध्यक्षाविरोधात तो शब्द वापरणे भोवले, विरोधकांकडून कामकाजावर बहिष्कार
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुपारी एका तहकुबीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, भास्कर जाधवांना बोलण्याची संधी द्यावी. तेव्हा अध्यक्ष म्हणाले आता आपण पुढे निघून गेलो आहोत. तेव्हा जयंत पाटील यांनी असा निर्लज्जपणा करू नका असे विधान केल्यामुळे सत्ताधारी गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांना तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली. सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला. त्यांच्या अशा वक्तव्याकडे दुर्लक्ष केल्यास चुकीचा पायंडा निर्माण होईल. सदस्यत्व रद्द करण्याचे ठराव आला आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. मुंबई व नागपूर येथील विधिमंडळाच्या परिसरात बंदी घालण्यात आली आहे. पण या निलंबनाचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध करत आंदोलन केले. यावेळी जयंत पाटील से जो टकराएगा, करेक्ट कार्यक्रम हो जाएगा, अशा घोषणा देत निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यात आला.
विशेष म्हणजे विरोधी पक्षातील आमदारांनी जयंत पाटील यांना खांद्यावर उचलले. जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी ‘जयंत पाटील से जो टकरायेगा, करेक्ट कार्यक्रम हो जायेगा’, तसेच ‘टप्प्यात आला, कार्यक्रम झाला’, अशा घोषणा जयंत पाटील यांच्या समर्थक आमदारांनी दिल्या. तर निलंबन झाल्यानंतर जयंत पाटील यांनी एक ट्विट केले. ‘या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार…बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ असे म्हणत त्यांनी आक्रमकपणा जाहीर केला आहे.