अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा
आप नेते विजय कुंभार यांची मागणी, बेकायदेशीर व अशोभनीय कृत्याबद्दल नाराजी व्यक्त
पुणे दि १७(प्रतिनिधी)- गेले दोन दिवस पुणे शहरांमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पथारी व्यावसायिकाची अन्न पदार्थांनी भरलेली भांडी लाथेने मारून उडवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एक जबाबदार शासकीय अधिकाऱ्या कडून जनतेप्रती केलेले असे वर्तन हे अशोभनीय, बेकायदेशीर व असंवेदनशील आहे. तरी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांना बडतर्फ करून या सबंध प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.
या प्रसंगामुळे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी हे जनतेप्रती अतिशय असंवेदनशील असल्याचा मेसेज पुण्यातील नागरिकांमध्ये गेला असून त्यामुळे महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली आहे. महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे अनेकदा मोठ्या लोकांविरोधात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई न करता मूग गिळून बसतात आणि सामान्य पथारी व्यावसायिकांवर मात्र अरेरावी, दडपशाही करतात असा अनेक नागरिकांचा अनुभव आहे. जप्त केलेले साहित्य हे महानगरपालिकेच्या गोडाऊनमध्ये अक्षरशः चुकीच्या पद्धतीने फेकून दिले जाते. अनेकदा त्याची मोडतोड केली जाते. जप्त केलेल्या साहित्याची परस्पर चोरी झाल्याच्या घटना देखील आपच्या निदर्शनास आल्या आहेत.
एकंदरीतच अतिक्रमण विभागाच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची गरज आम आदमी पक्षाला वाटते. असेही कुंभार म्हणाले आहेत. त्यामुळेच जगताप यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी आपने केली आहे.