
सरपंच पदाची संधी चालून आली अन् काळाने घात केला
महिला ग्रामपंचायत सदस्याचा काळाचा घाला, नंदा चतुर यांच्याबरोबर काय झाल?
नाशिक दि १७(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील महिलेचा धक्कादायक अंत झाल्याची घटना घडली आहे. नंदा योगेश चतुर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यांच्या या मृत्युने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नंदा चतुर या शेततळ्यात पाणी भरण्यासाठी पाइप टाकत असताना त्यांचा तोल जाऊन पाय घसरला व शेततळ्यातून बाहेर पडता न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. त्या घरी बराच वेळ होऊन देखील न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत विवाहितेचे पती योगेश रावसाहेब चतुर यांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढला. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नंदा चतुर या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सरपंचपद महिला राखीव असल्याने आवर्तन पद्धतीने त्यांना देखील सरपंचपद भूषवण्याची संधी मिळणार होती असे सांगण्यात येते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पश्चात पती व दोन मुले असा आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार इल्हे पुढील तपास करीत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार दशरथ मोरे, सोमनाथ इल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मीठसागरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.