गर्दीचा फायदा घेत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी
मंदिरात महिलेचे मंगळसूत्र चोरताना महिला चोर सीसीटीव्हीत कैद
कोल्हापूर दि २८(प्रतिनिधी) – नवरात्र उत्सव सुरु होताच मंदिरामध्ये गर्दी होऊ लागली आहे. पण यामुळे चोरट्यांचे सुद्धा चांगलेच फावत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र एका महिलेने चलाखीने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. पण पोलीसांनी त्या महिलेला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा चोरटी घेताना दिसत आहेत. यात महिलांना आपले शिकार बनवले जात आहे. काही महिला यासाठी मंदिर परिसरात सावज शोधताना दिसत आहेत. भाविकांच्या दर्शन रांगेसाठी मोठी गर्दी असल्याने महिला दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला टाकण्यात येत आहे. अशीच एका महिलेच्या दागिण्यातील चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण राजवाडा पोलीसांनी दागिणे लांबवणा-या महिलेला अटक केली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुना राजवाडा पोलिसांत मंगळसूत्र चोरीची तक्रार देण्यात आली होती.पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत चोरट्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे.सोनबत्ती जाटब असे त्या महिलेचे नाव आहे. तिने चोरलेले मंगळसूत्र ७० हजार रुपये किमतीचे होते. तिच्या आणखी साथीदार आहेत का? या आणि इतर गोष्टींची चाैकशी सध्या पोलीस करत आहेत.