Latest Marathi News
Ganesh J GIF

आखाड पार्टीत भयंकर राडा!, तडीपार गुंडाच्या डोक्यात घातला दगड; लोणी काळभोरमधील धक्कादायक प्रकार!

पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आखाड पार्टीच्या जेवणाची तयारी सुरू असताना जुन्या वैमनस्यातून एका तडीपार गुंडावर चार जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. त्याच्या डोक्यात थेट दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, मारहाण झाल्यानंतर या जखमी तडीपार गुंडाने थेट कोयता उगारून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

आईला भेटायला आला अन्…

पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (वय २२, रा. लोणी काळभोर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. भिसे हा रिक्षाचालक असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच पोलीस उपायुक्तांनी त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार झाल्यानंतर तो नांदेड परिसरात राहत होता. मात्र, ७ ऑगस्ट रोजी आईची तब्येत बिघडल्याचा फोन आल्यामुळे तो छुप्या पद्धतीने आईला भेटण्यासाठी लोणी काळभोर येथे आला होता.

आखाड पार्टीत थेट डोक्यात घातला दगड!

रविवारी (९ ऑगस्ट) भिसेच्या मामाने त्याला आखाड पार्टीचे निमंत्रण दिले होते. लोणी काळभोर परिसरातील एका मंदिरामागील शेडमध्ये जेवण बनवण्याचे काम सुरू होते. भिसे तिथे आपल्या मामाला मदत करत होता.त्याच वेळी जुन्या वैमनस्यातून चौघे जण तिथे धडकले. त्यांनी भिसेला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात थेट दगड मारला. त्याला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या बाळा भांड यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली.

रक्ताच्या थारोळ्यात असताना उगारला कोयता!

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जखमी झालेल्या भिसेने पोलिसांदेखत कोयता उगारून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस कारवाई

पोलिसांनी तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आणि कोयता बाळगल्याप्रकरणी पियुष भिसेविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!