भीषण! समृद्धी महामार्गावरील बस अपघातात प्रवाशांचा होरपळून मृत्यू
समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबेना, २६ प्रवाशांचा मृत्यू, ओळख पटवणेही कठीण
बुलढाणा दि १(प्रतिनिधी)- बुलढाणा येथे समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर यवतमाळहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे.
अपघातग्रस्त बस ही विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसचा अपघात पहिल्यांदा बस खांबाला धडकल्यानंतर पलटी झाली आणि आग लागली. त्यामुळे बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला. रात्रीची वेळ असल्याने त्यांना वाचवायला त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. काहीजण काचा फोडून बाहेर आल्यामुळे त्यांचे जीव वाचले आहेत. बस मध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस प्रवास करत होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. बसमधील आठ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर हा अपघात झाला. बसमध्ये असलेले बहुंताश प्रवासी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए टेस्ट करावी लागणार आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवाशांचे मोबाईल देखील जळून खाक झाले असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय किंवा आप्तांशी संपर्क होणे कठीण आहे. प्रवासी झोपेत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २ लाख मदतीची घोषणा केली आहे. तसेच अनेकांनी या अपघातानंतर शोक व्यक्त केला आहे.