Latest Marathi News
Ganesh J GIF

ठाकरे गटाचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरले?

उद्धव ठाकरे भाकरी फिरवणार, भाजपाबरोबरच बंडखोर खासदारांना देणार आव्हान, पहा उमेदवार

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे गटाची आज मुंबईत बैठक झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी मेळावे, शिवसेना वर्धापन दिनाबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच या बैठकीत लोकसभेसाठी उमेदवार देखील निश्चित करण्यात आले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याऐवजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांना मैदानात उतरवले जाणार आहे. तर अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून, भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात लढण्यासाठी मैदानात उतरवले जाणार आहे.तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून माजी महापौर आणि विद्यमान प्रतोद सुनिल प्रभू यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदारसंघात तयारीला लागा असे आदेश देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीत लोकसभा लढवल्यास ठाकरे गटाने २० जागांवर दावा केला आहे. तर दुसरीकडे तिन्ही पक्षांनी १६ जागा लढवाव्यात असा प्रस्तावावर देखील चर्चा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला होता, त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार निश्चिती आणि जागा निश्चिती करताना जोरदार खटके उडण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील निवडणूकीत शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले होते त्यात मुंबई उत्तर-पश्चिममधून गजानन किर्तीकर, मुंबई दक्षिण-मध्य मधून राहुल शेवाळे आणि मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत विजयी झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वास्तव तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यत पोहोचण्यासाठी निकालाची प्रत आणि त्यातील ठळक मुद्दे कार्यकर्त्यांना आता सर्व जिल्हाप्रमुखांनी समजून सांगायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आपल्या बाजूने असलेले सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!