ठाकरेंच्या अडचणी संपेनात! आता सर्वोच्च न्यायालयाचाही दणका
न्यायालयाने ठाकरेंना बजावले, शिंदे गटाकडून न्यायालयात ठाकरेंची कोंडी
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरेंच्या अडचणी कमी होण्याएैवजी वाढतच आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. याचिका दाखल करण्यासाठी उद्या या असे न्यायालयाकडून ठाकरे गटाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. तेंव्हापासुन ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षातील नेते, पदाधिकारी, यासह शाखा संभाळण्याचे आवाहन ठाकरेंसमोर आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार होता. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आजच सुनावणी होऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज ठाकरे गटाची याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला उद्या पुन्हा न्यायालयात जावे लागणार आहे.
ठाकरेंनंतर आता शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाकडून न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घेतली जावी, अशी विनंती या ‘कॅव्हेट’च्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे लढा आणखी तीव्र झाला आहे.