ठाकरेंची मशाल कर्नाटकच्या निवडणूकीत धगधगणार
पक्षातील फुटीनंतर राज्याबाहेर ठाकरे गटाची कसोटी, पक्ष इतक्या जागा लढवणार
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरे देखील कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
ठाकरे गटाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. थेट भाजपसमोर आव्हान उभे करण्यासाठी ठाकरे गट कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात उतरत आहे. बेळगाव जिल्ह्यातील ५ विधानसभा जागा लढवणार आहे. याबाबत बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार आहोत. एकीकरण समितीच्या आड कोणीही येऊ नये. याबाबत उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असे सावंत म्हणाले आहेत. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद कायम धगधगत असतो, सीमावर्ती भागातील लोकांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे येथील लोक ठाकरे गटाच्या पाठिशी राहतील, अशी शक्यता लक्षात घेऊन ठाकरे गटाने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकात १० मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आता एकूण ५ हजार १०२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ठाकरे गट लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केल्यानंतर सेनेत उभी फूट पडली. पक्षाचे नाव आणि चिन्हे शिंदे गटाकडे गेले आहे. त्यात बेळगाव पालिकेत मराठी भाषिकांची सत्ता राहिली आहे. त्यामुळे आता ठाकरे गट ही निवडणूक लढवत असल्याने किती यश मिळवतो याकडे लक्ष आहे.