नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प
बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्ढावलेल्या भाजपाला जाब विचारू, राजस्थानच्या धर्तीवर आरोग्याचा कायदा करा
मुंबई दि १(प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरातबाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकऱ्यांना पैसे देताना हात आखडता घेते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प असून भरीव मदत जाहीर केली पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल व निर्ढावलेल्या सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
गांधीभवन येथे प्रदेश काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व CWC सदस्य अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कोअर कमिटीच्या बैठकीत दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई यासह जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नावर गंभीर चर्चा झाली. विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, यांच्यासह इतर नेते नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते पण त्यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहे पण भाजपा सरकार त्यांना मदत देत नाही. याआधी सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी विधानसभेत व रस्त्यावर उतरून जाब विचारेल. लाखो तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहे, MPSC स्पर्धा परिक्षेची तयारी लाखो विद्यार्थी करत आहेत पण सरकार नोकर भरती जाहीर करत नाही. राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. सरकारने तातडीने नोकर भरती जाहीर करावी. आरोग्याचा प्रश्नही गंभीर असून राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरोग्याचा कायदा करावा. भारतीय जनता पक्ष जाती-धर्मांत भांडणे लावून विभाजवादी राजकारण करत आहे. अनेक राज्यात हिंदू मुस्लीम वाद लावून मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातही हिंदू मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती संभाजीनगरमधून असा वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर सात शहरात तसा प्रयत्न झाला पण राज्यातील जनतेने भाजपाचा हा अजेंडा हाणून पाडला असेही पटोले म्हणाले आहेत.
हिंदू मुस्लीम अजेंडा चालला नाही म्हणून मराठा- ओबीसी समाजात वाद निर्माण केला आहे पण पुरोगारी महाराष्ट्रात हेही चालणार नाही. सर्व जातींना आरक्षण दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष व राहुलजी गांधी यांनी आरक्षण प्रश्नी भूमिका जाहीर केलेली आहे. जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे. हे दोन निर्णय घेतले तर ज्या जाती आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागास आहेत त्यांना आरक्षणाचा फायदा देता येईल, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.