
दिल्ली दि २६ (प्रतिनिधी)- देशातील सर्वात जुना आणि जास्तकाळ सत्तेत राहणाऱ्या काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय दयनीय झाली असुन पक्षातील जुने जाणते नेते एकापाठोपाठ एक राजीनामा देत आहेत. आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.
गुलाम नबी आझाद हे काँग्रेसवर नाराज होते. बऱ्याच काळापासून त्यांची ही नाराजी कायम होती. जी-२३ गट हा काँग्रेसमध्ये बदल करण्याची मागणी सातत्यानं करत होता. या गटात आझाद देखील होते. यापूर्वी काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांना समाजवादी पक्षाने राज्यसभेवर देखील पाठवले आहे. जी २३ गटाने काँग्रेस पक्षाअंतर्गत अनेक बदल सुचवले आहेत. पण काँग्रेस फक्त चर्चा आणि बैठका घेत आहे २०१९ पासून काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडता आलेला नाही.त्यामुळे अनेक वरिष्ठ नेते काँग्रेसवर नाराज आहेत. गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याचे स्पष्ट झाले होते. पक्षाची भूमिका आणि अध्यक्षपद निवडणूक आदींसह इतर मुद्द्यांवरही त्यांच्यात मतभेद होते. राज्यसभेतून निवृत्त होत असताना त्यांची आणि मोदींची दोस्ती चांगलीच चर्चेत आली होती.
काँग्रेसने जम्मू- काश्मीरमध्ये आझाद यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना निवडणूक अभियान समितीचे अध्यक्ष केले होते. मात्र, काही तासांतच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हाच त्यांची नाराजी उघड झाली होती. आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काश्मीरमध्ये काँग्रेस फक्त नावालाच उरण्याची शक्यता आहे.