महागाईचा अमृतकाळ! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ
सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार, व्यावसायिक सिलिंडरही महागले, बघा नवीन दर
पुणे दि १(प्रतिनिधी)- महागाईच्या भडक्यात होरपळून निघत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना निवडणूकीची धामधुम संपताच सरकारने जोरदार दणका दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे.
घरगुती गॅस सिलेंडर दरात कंपन्यांनी मोठ्या ५० रुपयांनी वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ११०३ रुपये झाली आहे. आतापर्यंत हे सिलिंडर १०५३ रुपयांना मिळत होते. नवीन दर १ मार्चपासून लागू झाले आहेत. यापूर्वी जुलै २०२२ रोजी तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली होती. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर पाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर २ हजार ११९ इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर महागाईपासून दिलासा मिळेल अशी आशा होती. पण प्रत्यक्षात महागाईचा भडका उडाल्याचे चित्र आहे.
ओएमसीने गेल्या वर्षी ६ जुलै रोजी घरगुती सिलिंडरच्या किमती वाढवल्या होत्या. सिलिंडरच्या दरात १५३.५ रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी चार वेळा दरात वाढ करण्यात आली होती. मार्च २०२२ मध्ये प्रथम ५० रुपयांनी, पुन्हा ५० रुपयांनी आणि मे मध्ये ३.५० रुपयांनी वाढ केली. यानंतर जुलैमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.