
शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे घोडे गंगेत न्हाले
दोन्ही पक्षाच्या १८ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- शिंदे – फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटाचे ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजच्या विस्तारात सर्व कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे.
पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेली नाही. यावरुन विरोधकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तर संजय राठोड यांच्या समावेशावरून विरोधकांनी टिका केली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्री सहभागी झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी ९ मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजय कुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांची प्रथमच मंत्रीपद मिळणार आहे. तर काहीजणांची राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळाली आहे.
शिंदे गटात बच्चू कडू आणि संजय शिरसट यांना मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज असल्याची चर्चा आहे तर भाजपाकडुनही पंकजा मुंडे आणि विधान परिषदेवर असणाऱ्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही त्यामुळे भाजपाच्या गोटातही नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे.