
बायकोचा खून करून पतीने केली आत्महत्या
हत्येचे कारण अस्पष्ट, परिसरात तर्कवितर्काला उधान, दांपत्याच्या हत्येने चिमुकले पोरके
वर्धा दि १७(प्रतिनिधी)- वर्धा जिल्ह्यात एका पतीने आधी पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत: सुद्धा विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
कुंदन ज्ञानेश्वर कांबळे व शीतल कुंदन कांबळे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे दाम्पत्य काही वर्षांपासून आंजी (मोठी) येथे वॉर्ड क्रमांक ४ मध्ये भाड्याने राहत होते. सायंकाळपर्यंत त्यांच्या घराचे दार उघडले नसल्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत कुंदनच्या भावाला कळविले. भावाने लगेच धाव घेत आंजीच्या पोलिस चौकीत माहिती दिली असता पोलिसांनी रात्री आठ वाजता घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने घराचे दार उघडल्यावर घरात बघितले असता पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासात पती कुंदन याने पत्नी शीतलची दगडाने मारहाण करीत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर रक्ताने माखलेले हात स्वच्छून धुवून स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.मृत दाम्पत्याला १३ वर्षांची मुलगी मैत्री व ९ वर्षांचा मुलगा सम्राट अशी दोन अपत्ये आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते नातेवाईकांकडे गेले होते.
पती- पत्नी हे दोघेच घरी असल्याने विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. खारांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर हे याप्रकरणी तपास करीत आहेत. पण
आता दोन्ही चिमुकले आई वडिलांअभावी पोरकी झाले आहेत. त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.