आघाडीची ‘ही’ अभिनेत्री झळकणार बायोपिक चित्रपटात
'माणदेशी एक्सप्रेस'चा प्रवास रूपेरी पडद्यावर, पहा काय म्हणाली ही अभिनेत्री
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे.आता तिच्या या संघर्षावर एक चित्रपट येणार आहे.
ललिताचा हा जीवन प्रवास दाखवणारा ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.’ललिता बाबर’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणाली की, “ललिता बाबर सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.” असे सांगताना तिने एक फेसबुक पोस्ट केली आहे त्यात ती म्हणते की, नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा ह्या खास दिवशी हि खास अन्नऊन्समेंट ललिता शिवाजी बाबर
चंद्रमुखीची कात टाकून आता हि नवी कात ओढण्याची वेळ नव्या वर्षाचं नवं स्वप्नं …. नवं धाडस … नवी परीक्षा
एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या राज्याचेच नाही तर देशाचे हि नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. हे शिवधनुष्य मी एक अभिनेत्री म्हणून तर उचलं आहेच पण ह्या वेळीस जबाबदारी मोठी आहे तुमची साथ तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्या जय हिंद जय महाराष्ट्र
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करणार आहे.अमृता खानविलकरचा हा पहिलाच बायोपिक असणार आहे.