पुणे पोलीसांनी काढली कोयता गँगची भररस्त्यात धिंड
धिंड काढण्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांचा नवा फंडा
पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यात दहशत माजवणा-या कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील धायरी परिसरात भैरवनाथ मंदिराजवळ एका टोळक्याने धुडगूस घातला होता. तसेच भाजी मंडईत कोयते हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. अखेर पुणे पोलीसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
सिंहगड रोड पोलीसांनी कोयता गँगमधील तीन सराईत गुंडांना पकडून त्यांची वाजत गाजत धिंड काढली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना खब-याकडून हे आरोपी गारमाळ येथील एका घरात दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर गार मळ्यापासून ते धायरी येथील घटनास्थळा पर्यंत त्यांची पायी रस्त्यावरून धिंड काढली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव अशी तिघांची नावे आहेत. या धिंडीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
ज्या ज्या परिसरात या गुंडांनी धुडगूस घातला, त्याच परिसरात धिंड काढणे आणि चोप देण्याची मोहीमच पुणे पोलीसांनी हाती घेतली आहे. पुणे पोलिसांच्या या नव्या पॅटर्नचे नागरिकांनी काैतुक केले आहे. पण पुणे पोलिसांना अजूनही पूर्णपणे कोयता गँगचा अटकाव करण्यात अपयश आले आहे.