मुंबई दि २३ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.पण शिंदे फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीची यादी रद्द करत नव्या सरकारची नवी यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच राज्यपाल नियुक्त १२ नावे राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. या नावांवर अंतिम चर्चाही झाली आहे.महाविकास आघाडीच्या यादीवर निर्णय न घेणारे राज्यपाल शिंदे फडणवीस सरकारची यादी स्वीकारणार का हा चर्चेचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. राज्यपालांकडे पाठवल्या जाणाऱ्या यांदीत आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार लाॅबिंग सुरु आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.सध्या शिंदे गटाकडून रामदास कदम,विजय बापु शिवतारे, आनंदराव अडसुळ,अभिजित अडसुळ, अर्जुन खोतकर,नरेश मस्के,चंद्रकांत रघुवंशी, राजेश क्षीरसागर ही नावे चर्चेत आहेत तर भाजपाकडुन हर्षवर्धन पाटील,चित्रा वाघ,पंकजा मुंडे,कृपाशंकर सिंग,गणेश हाके,सुधाकर भालेराव यांची नावे आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यपालांकडे आमदारांची यादी पाठवण्यात आली होती. पण राज्यपालांनी यावर कुठलाही निर्णय घेतला नव्हता. त्याचबरोबर सरकार आणि राज्यपाल या दोन्हीमध्ये वारंवार संघर्ष पहायला मिळाला. आता शिंदे फडणवीस सरकारची यादी राज्यपाल कधी स्वीकारणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.