कर्नाटकवरचे कर्ज ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारचेच
मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का?, समृद्धी महामार्गावरुन सरकारची कोंडी?
मुंबई दि १(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर खोटे आरोप केले. कर्नाटक व राजस्थान सरकारने कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. वास्तविक पाहता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. त्याआधी कर्नाटकात भाजपाचे सरकार होते. कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारनेच कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला आहे, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आरोप खोडून काढताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कर्नाटक सरकारने कर्ज केले, त्यांच्याकडे विकासासाठी आता पैसे नाहीत असा आरोप मोदी करतात पण नरेंद्र मोदी यांनीच केवळ ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे. मोदींच्या आधी ६७ वर्षांत देशातील सर्व सरकारांनी मिळून अवघे ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज केले होते म्हणजे मोदींनी ९ वर्षातच कर्जाचा डोंगर तिप्पट उभा केला. एवढे मोठे कर्ज करुनही देशातील गरिबांची संख्या कमी झाली नाही उलट वाढली. रोजगार निर्माण झाले नाहीत, महागाई कमी करता आली नाही. ९ वर्षात गरिब आणखी गरिब झाला तर मुठभर लोक मात्र अब्जाधीश झाले. मोदी सरकारमध्ये केवळ मुठभर ‘मित्रों’चा फायदा होत असून गरिबांचे मात्र रक्त शोषून घेतले जात आहे. महाराष्ट्रातील भाजपाप्रणित सरकारनेही कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे, याची माहिती पंतप्रधानांनी घ्यायला हवी होती. देशाच्या पंतप्रधानांनी बोलताना अभ्यासपूर्ण व माहिती घेऊन बोलावे केवळ राजकीय आरोप करण्यासाठी फेकाफेकी करू नये. असा टोला लगावला. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा मोठा गाजावाजा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. समृद्धी महामार्ग बांधताना तांत्रिकदृष्ट्या सुखक्षेच्या उपाययोजना केल्याचे दिसत नाही. समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी किती असुरक्षित आहे हे मागील सहा-सात महिन्यात दिसले आहे. या महामार्गावर दररोज मोठे अपघात होऊन लोकांचे बळी जात आहेत. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात पाउल ठेवण्याच्या आधीच शहापूरजवळ या महामार्गाचे काम सुरु असताना अपघात होऊन १८ गरिब मजुरांचा मृत्यू झाला. भाजपा सरकार समृद्धी महामार्गावर आणखी किती बळी घेणार आहे? समृद्धी महामार्गाचे ऑडिट करुन सर्व त्रुटी दूर करणे गरजेचे आहे पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. महामार्गाचे व त्याच्या उद्घाटनचे श्रेय घेता मग या महामार्गावरील नाहक बळींची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल पटोले यांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले परंतु ज्या व्यक्तीने सर्वोच्च पदावर बसून देशात केवळ द्वेषाची बिजे पेरली, हिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी घातले असा भारत लोकमान्य टिळक यांना आवडला नसता. लोकमान्य टिळक यांनी हिंदू-मुस्लिम एकतेसाठी मोठे प्रयत्न केले आहेत. लोकमान्यांनी जुलमी ब्रिटीश सत्तेविरोधात जनतेला एकत्र आणण्याचे काम केले आणि स्वतंत्र भारतात मात्र जनतेला एकमेकांविरोधात लढवण्याचे पाप भाजपा व नरेंद्र मोदी करत आहेत. लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीच्या अगदी उलट नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची विचारसरणी आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत.