अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या मुलाची आईने केली हत्या
प्रियकराच्या मदतीने पोटच्या पोराचा काढला काटा, आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना
सांगली दि ९(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या स्वत:च्या पोटच्या ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला आईने प्रियकराच्या मदतीने विहीरीत फेकून त्याची हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधासाठी आईच्या नात्याला कलंकीत करण्याचा संतापजनक प्रकार सांगलीतुन समोर आला आहे.
पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडग या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर शौर्य असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती लोंढे या विवाहितेचे रुपेश घाडगे सोबत काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योतीचे लग्न झाले असून तिला शौर्य नावाचा सहा वर्षाचा मुलगा होता. मात्र ज्योती आपल्या नवऱ्यासोबत राहत नसून त्या दोघांनी घटस्फोटची घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर ज्योती आणि रुपेशला लग्न करायचे होते.परंतु, ज्योती हिचा ६ वर्षाचा मुलगा शौर्य हा अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी त्याच्यातील हा अडथळा दूर करण्यासाठी चिमुकल्या शौर्य याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार या दोघांनी कारस्थान रचले. सहा मेला शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आई विटा पोलिसांना दिली. तर रुपेशने शौर्यला दुचाकीवर नेऊन ढोराळे रस्त्यावर आडरानात असलेल्या विहीरील फेकून दिले. तपासा दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रुपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली. त्यानंतर पोलीसांनी कसुन चाैकशी केली असता अनैतिक संबंधास व विवाहाला अडसर ठरत असल्याचे आम्हीच शौर्य याला विहीरीत फेकून देऊन त्याचा कायमचा काटा काढल्याचे पोलीसांना कबुली दिली.
या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरीकांनी आपला रोष व्यक्त करत संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. याप्रकरणी ज्योती लोंढे व तिचा प्रियकर रूपेश घाडगे याला पोलीसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे पुढील तपास करीत आहेत.