‘राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही’
साखर आयुक्तांना भेटून त्यांच्याशी साखर कामगारां च्या प्रश्नांवर चर्चा करणार, अध्यक्ष काळे यांची माहिती
इस्लामपूर दि ११(प्रतिनिधी)- राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. आपणास आपण कुठे कमी पडतो? याचे आत्मचिंतन करावे लागेल. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो,असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासो काळे यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसात नव्या साखर आयुक्तांना भेटून त्यांच्याशी साखर कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्लामपूर येथे सांगली जिल्हा साखर कामगार समन्वय समिती व वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील साखर कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांना धमकी दिलेल्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात आला. तात्यासो काळे पुढे म्हणाले,केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे ४४ कायदे रद्द करून ४ कायदे केले आहेत. ते कायदे कामगार विरोधी आहेत. आपणास संघटीतपणे या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करावे लागेल. राज्याचे साखर आयुक्त निवृत्त झाले असून येत्या काही दिवसात नव्याने आलेल्या साखर आयुक्तांना भेटून त्यांच्यासमोर साखर कामगारांचे प्रश्न मांडणार आहोत. परवा आपणा साखर कामगारांचे आधारस्तंभ शरद पवार यांना भेटून त्यांच्याशी साखर कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे. येत्या काही महिन्यात राज्यातील साखर कामगारांचे चिंतन शिबीर घेणार आहोत. राऊसो पाटील म्हणाले,काही संघटना सेवानिवृत्त साखर कामगारांना पेन्शन वाढवून देण्याची स्वप्ने दाखवून पैसे उकळत आहेत. त्यांनी ही साखर कामगारांची फसवणूक बंद करावी. संघटनेने व्यसनमुक्ती चळवळ,साखर कामगारांची मुले शिकायला हवीत यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. येत्या ३१ मार्च २०२४ ला करार संपत आहे. आपणास साधारण ५० हजार साखर कामगारांचा मोर्चा साखर आयुक्तांच्या कार्यालयावर न्यावा लागेल. त्याची आतापासूनच तयारी करायला हवी. शंकरराव भोसले म्हणाले,राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान केलेले आहे. मात्र सध्या सहकारी साखर कारखान्यां च्यासमोर खाजगी साखर कारखान्यासह अनेक गंभीर प्रश्न उभा आहेत. राज्यातील साखर कामगारांचे ६०० कोटी रुपयांचे पगार थकलेले आहेत. आम्ही संघटनेच्या वतीने जिल्हावार मेळावे घेऊन कामगारांचे प्रश्न समजून घेत आहेत.
यावेळी विजयराव देशमुख,श्रीकांत पाटील,कृष्णा धनवे, शिवाजी पाटील,सागर शेटे,तानाजी साळुंखे,एस.के.कापूरकर, संभाजी पुजारी,संजय पवार,एन.जी.पाटील, लालासाहेब वाटेगावकर,विकास पवार, मोहनराव शिंदे,संजय शेळके यांच्यासह जिल्ह्यातील साखर कामगार संघटनेचे पदाधिकारी व साखर कामगार उपस्थित होते.