वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण
पोलिसाच्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांकडून संताप व्यक्त, कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर दि २०(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर शहरातील एका चाैकात वाहतूक पोलिसाने एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांच्या या वर्तनावर संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चाैकात वाहतूक पोलिसाने एका दुचाकीवरील तरूणाला लाथा आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. सिग्नल तोडल्याबद्दल पोलीसांनी ही बेदम मारहाण केली असल्याचे बोलले जात आहे. पोलिसाने तरूणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सिग्नल तोडल्यानंतर अथवा जंप केल्यानंतर पोलिसांना मारण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अलीकडच्या काळात पोलिसांच्या वर्तनात उद्धटपणा असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस काय कारवाई करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
पोलीस आपल्या अधिकारांचा गैरवापर करताना आढळून आले आहेत. वाहतूक पोलीसांनी लाच मागितल्याचे व्हिडिओ देखील अनेकदा समोर आले आहेत. या घटनेतील ते वाहतूक पोलीस आणि तरूण यांच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.