औरंगाबाद – सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून लिंगभेदावर केलेले भाष्य भोवण्याची शक्यता आहे.
त्यांच्या या विधानावरून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडली. अखेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांच्याबाबत एक मोठा निर्णय दिला आहे.
कोर्टाने काय दिला निर्णय?
इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे. इंदोरीकर महाराज यांनी लिंगभेदाबाबत विधान केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती.
काय आहे नेमके प्रकरण?
इंदोरीकर महाराज हे मिश्किल, विनोदी आणि उपरोधिक शैलीत कीर्तन करण्यात प्रसिद्ध आहे. शिर्डीत त्यांचं कीर्तन सुरू असताना त्यांनी लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते तसेच स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असेदेखील ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावरून संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.