Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाच्या महिला आमदाराने अभियंत्याच्या लगावली कानशिलात

आमदार महिलेचा रुद्रावतार कॅमे-यात कैद, अभियंत्याकडून तक्रार दाखल, भाजपाचे मात्र हातवर?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून लोकप्रतिनिधी बेताल वागत असल्याच्या घटना सातत्याने घडत आल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार बांगर यांनी तर एक दोनदा नव्हे तर अनेकदा कायदा हातात घेतला होता. पण आता भाजपाच्या आमदार गीता जैन यांनी एका कंत्राटी अभियंत्याच्या थेट कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मिरा रोडच्या पेणकर येथील कक्कड इमारती लगत असणाऱ्या जागेतील एका झोपड्यावर १६ जून रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. यात त्या कुटुंबाची झोपडी पाडण्यात आली. या कारवाईत विनवण्या करूनही अधिकाऱ्यांनी न एैकता भर पावसात लहान मुलांना आणि गर्भवती महिलेला बळजबरीने घरातून बाहेर काढत कारवाई केली अशी तक्रार आमदार गीता जैन यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे आमदार पाहणी करण्यासाठी घटनास्थळी गेल्या होत्या. पावसाळ्यात बांधकामांवर कारवाई न करण्याचे आदेश असताना पालिकेमार्फत कारवाई का करण्यात आली? असा सवाल त्यांनी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना केला. पण यावेळी एक अभियंता हसत असल्याचे पाहून जैन यांना आपला राग अनावर झाला. आणि त्यांनी थेट त्या अभियंत्याच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शुभम पाटील असे त्या अभियंत्याचे नाव आहे. दरम्यान पीडित कुटुंबाला घरातून बेघर केलं आणि अभियंता हसत होता. हा प्रकार अजिबात सहन होणारा नाही. यामुळे आपण त्याच्या कानाखाली लगावली. याबद्दल मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही. कुठल्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार आहे, असे आमदार गीता जैन म्हणाल्या आहेत.

लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, एखाद्या गोष्टीत राग अनावर होऊ शकतो. तरीही लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हेच योग्य आहे, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन यांच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जैन एकाकी पडल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!