‘…मग मला मुख्यमंत्री करा तुमचे प्रश्न चुटकीसरशी संपवतो’
छत्रपतींचे विधान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणखी एका नेत्याची भर, राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण
कोल्हापूर दि १४(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नवे फेरबदल देखील होत आहेत. त्याचबरोबर राज्यातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देखील वाढताना दिसत आहेत. गेले काही वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. पण आता या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या गर्दीत आणखी एका नावाची भर पडली आहे. त्यामुळे राजकारणात नवीनच चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाने त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा दिसून आली आहे. मला मुख्यमंत्री करा मी तुमचे सर्व प्रश्न संपवतो, असं विधान छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापुरात सारथी संस्थेसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन स्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावे, यांसारख्या मागण्यांसाठी फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाचे प्राध्यापक सहभागी झाले आहेत.छत्रपती संभाजीराजेंनी सरसकट फेलोशिप प्रश्नी लक्ष घालावे आणि प्रश्न मिटवावा त्यानंतरच आम्ही आमचं आंदोलन थांबवतो, अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान राज्यात काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यातच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केल्यानं चर्चेता विषय बनला आहे. तसेच त्यांनी स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दाैरा देखील केला होता. आता छत्रपती संभाजी राजेंच्या या भूमिकेला पाठिंबा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेतही संभाजीराजे छत्रपतींनी असेच विधान केले होते. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राचे राजकारण मुख्यमंत्री पदाभोवती फिरताना दिसत आहे. तसेच अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर देखील झळकले आहेत.