‘भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक राष्ट्रवादीत आहेत’
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा गाैप्यस्फोट, जयंत पाटलांचा रोख अजितदादांकडे?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्य खळबळ उडाली. त्यानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. पण आता जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे. पक्षातील अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असं पवारांनीच पुस्तकात लिहिलं आहे आणि आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्हाला जे करायचंय ते करा; असं पवारांना सूचित करायचं आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत पाटील म्हणाले की, “भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र माझ्यासमोर अशी भूमिका कुणीही व्यक्त केलेली नाही, त्यांच्या या गाैप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीतील गटतट समोर आले आहेत. त्यामुळे अजितदादांचे बंड फक्त बातम्यांमध्ये नाही तर प्रत्यक्षात होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण त्याचवेळी जयंत पाटील यांनी “राष्ट्रवादी काँग्रेसला आज विस्तार करण्याची संधी आहे. राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महाविकास आघाडी तुटावी असं कुणाला वाटत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे सांगत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांनीही “कुणाला जायचंच असेल तर मग तो कोणत्याही राजकीय पक्ष असो, कुणाला थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेत आणखी बळ कसं वाढू शकतं, याकडे अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. हेच मला समजतं. पण अशी गोष्ट आमच्या संघटनेत नाही असे म्हणत पक्षात भाजपात जाण्याचा आग्रह असणारा गट असल्याचे कबूल केले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार हे नाराज असून ते लवकरचं भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आणखी काही आमदार हे भाजपात जाणार असल्याचे बोलले जात होते, तसे संकेत भाजपच्या नेत्यांकडूनही मिळू लागले होते. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी तशी भूमिका देखील घेतली होती. त्यामुळे भाजपात जाण्याची इच्छा असणारे नेते कोण आहेत असा प्रश्न समोर आला आहे.